मुंबई : जळगावचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमात शिंदे यांनी उन्मेष पाटील यांच्या राजकीय भविष्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली
पक्षप्रवेशानंतर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उन्मेश पाटील यांच्या खासदारकीच्या काळातील कामांचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले. जळगावमध्ये त्यांनी अनेक विकासकामे केली असून कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सुचवले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नव्या चर्चांना उधाण आले आहे. कारण, सध्या जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपचे आहेत.
विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेमुळे गडबड झाल्याने त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र त्यांचे राजकीय भविष्य मोठे आहे. आगामी काळात त्यांना पुन्हा खासदार म्हणून निवडून देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी,” असे शिंदे म्हणाले. तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे महायुतीला मोठे जनसमर्थन मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
“लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे राज्यातील महिलांमध्ये महायुतीबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे इतक्या मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार निवडून आले,” असेही त्यांनी सांगितले. यावेळी वातावरण हलके फुलके करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी “आपला खान्देश, आपला उन्मेश” असा नारा दिला. “फक्त मंत्री गुलाबराव पाटील हेच डायलॉग मारतात असे नाही, मीही मारतो” या त्यांच्या वक्तव्यामुळे एकच हशा पिकला. दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदे बोलत असताना मंत्री गुलाबराव पाटील यांचे लक्ष दुसरीकडे असल्याचे दिसून आले. तेव्हा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या पाठीवर थाप मारत “काय गुलाबराव?” असे म्हणत त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर मंत्री पाटील यांनीही “आपला खान्देश, आपला उन्मेश” असे म्हणत उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. या प्रसंगामुळे कार्यक्रमात काही काळ हास्याचे वातावरण निर्माण झाले.















Discussion about this post