खेडी व्यव्हारदळे (अमळनेर) – समाजात आजही अनेक जुन्या रूढी-परंपरांचे पालन केले जाते. विशेषतः अंत्यसंस्काराच्या वेळी मुलानेच वडिलांना अग्नी द्यावा, अशी समजूत रूढ आहे. मात्र अमळनेर तालुक्यातील खेडी व्यव्हारदळे येथे घडलेल्या एका घटनेने या परंपरेला छेद देत पुरोगामी विचारांचा नवा संदेश दिला आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या मंगलाबाई भीमराव मेराळै यांनी स्वतः पुढे येत पित्याला मुखाग्नी देत अंत्यसंस्कार पार पाडले.
खेडी व्यव्हारदळे येथील अमृत नागो गजरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना सहा मुली असून मुलगा नव्हता. आयुष्यभर कष्ट करून कुटुंबाचा संसार सांभाळणाऱ्या अमृत गजरे यांच्या वृद्धापकाळात त्यांच्या कन्या मंगलाबाई मेराळै यांनी त्यांची सेवा-शुश्रूषा केली. वडिलांच्या आजारपणापासून त्यांच्या दैनंदिन गरजांपर्यंत सर्व जबाबदारी त्यांनी मुलाप्रमाणे स्वीकारली होती.
अमृत गजरे यांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला असता, मंगलाबाई मेराळै यांनी पुढाकार घेत वडिलांना अग्नी देण्याचा निर्णय घेतला. समाजात प्रचलित असलेल्या ‘मुलानेच अग्नी द्यावा’ या परंपरेला बाजूला ठेवत त्यांनी पित्याप्रती कर्तव्य पार पाडले. मुलगा-मुलगी समान असल्याचा विचार त्यांनी कृतीतून दाखवून दिला.
अमृत गजरे यांच्या अंत्ययात्रेला गावातील ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगलाबाईंनी दिलेला अग्निडाग हा केवळ एक धार्मिक विधी नसून, तो पित्याप्रती असलेल्या कृतज्ञतेचा आणि मायेचा भाव असल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयाचे गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.
या घटनेमुळे खेडी व्यव्हारदळे गावाने सामाजिक परंपरांमध्ये बदल घडवून आणणारा पुरोगामी संदेश दिला असून, मुली देखील कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडू शकतात हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.















Discussion about this post