जळगाव । मध्यपूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या तीव्र संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण झाली आहे. या संघर्षात अमेरिका सहभागी झाल्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याच्या मागणीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्याचे थेट परिणाम जळगावच्या सराफ बाजारात दिसून आले.
शहरातील सुवर्ण बाजारपेठेत फेब्रुवारीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी दिवसभरात सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली. दोन्ही धातुंच्या दरात अचानक दरवाढ झाल्याने ग्राहकांना धक्का बसला. दरवाढीमुळे दागिन्यांच्या विक्रीवर परिणाम झाल्याने सुवर्ण व्यावसायिकांनी देखील डोक्याला हात लावला.
शनिवारी दिवसभरात तीन वेळा सोने दरात वाढ झाली. बाजार उघडताच सोन्याच्या दरात ६ हजार ५०० रुपयांची वाढ झाली. दुपारी ३ वाजता दरात पुन्हा १ हजार ५०० रुपयांची भर पडली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास आणखी १ हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली. अशाप्रकारे एका दिवसात तब्बल ९ हजार रुपयांची उसळी घेत सोन्याचा दर जीएसटीसह प्रतितोळा १ लाख ७३ हजार ४० रुपये इतका झाला आहे.
जागतिक घडामोडींचा स्थानिक बाजारावर प्रभाव
युद्धजन्य परिस्थितीत गुंतवणूकदार शेअर बाजारासारख्या जोखमीच्या पर्यायांऐवजी सोन्यासारख्या सुरक्षित पर्यायाकडे वळतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढली असून दरात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. जळगावच्या बाजारातही त्याचाच परावर्तित परिणाम दिसत आहे.
लग्नसराईत ग्राहकांची चिंता वाढली
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्याच्या दरातील अचानक वाढीमुळे खरेदीदार अडचणीत आले आहेत. अनेकांनी खरेदी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिकांच्या मते, युद्धाची परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.















Discussion about this post