राज्यातून थंडी आता अधिकृतपणे माघार घेत असल्याचे चित्र आहे. उत्तर भारतातून येणारे थंड वारे मंदावले असून, बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे सरकत आहेत. या बदलत्या हवामानामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत गारवा कमी होऊन तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत १७ व १८ फेब्रुवारीदरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. तसेच सोलापूर आणि अहिल्यानगर भागातही किरकोळ पावसाचा अंदाज आहे.
कोकणात उष्णता वाढली
मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी परिसरात दिवसा उष्णतेची तीव्रता वाढू लागली आहे. रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. येत्या काही दिवसांत उकाडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
विदर्भ-मराठवाड्यात संमिश्र हवामान
विदर्भ आणि मराठवाडा भागात पुढील ४८ तास संमिश्र हवामान राहील. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे रात्री हलका गारवा जाणवेल; मात्र १८ फेब्रुवारीनंतर तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका तीव्र होण्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
रब्बी पिके काढणीच्या टप्प्यावर असताना पावसाचा अंदाज चिंतेचा विषय ठरत होता. मात्र अपेक्षित पाऊस हलका स्वरूपाचा असेल आणि वादळी वाऱ्यांसह गारपिटीची शक्यता नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत हा हलका पाऊस पिकांसाठी पूरक ठरू शकतो.
जळगावातही उकाडा वाढला
जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून थंडी गायब झाली असून दुसरीकडे तापमानात झालेल्या वाढीमुळे उकाडा वाढला आहे. आगामी दिवसात तापमान ३८ अंशापर्यंत जाणार असल्याचा अंदाज असून उकाडा वाढणार आहे.















Discussion about this post