मुंबई । महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडण्याची शक्यता असून दिवंगत अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. विधानसभेच्या अधिवेशनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थ खात्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण अन्य खाती सोपवण्यात आली होती. मात्र अर्थ खाते मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःकडेच ठेवले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, अर्थसंकल्प मांडल्यानंतर पुढील २ ते ३ महिन्यांत अर्थ खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिले जाईल.अजित पवार यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांच्या निधनानंतर हे खाते तात्पुरते मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून घेण्यात आला होता. मात्र आता पक्षाकडे पुन्हा अर्थ खात्याची धुरा सोपवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या निर्णयामुळे राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये नवे संकेत मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा अर्थ खात्याची जबाबदारी दिल्यास पक्षाची ताकद वाढेल, अशी राजकीय विश्लेषकांची चर्चा आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी अधिवेशनानंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.















Discussion about this post