मुंबई : राज्यातील संभाव्य वीजदरवाढीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर तीव्र टीका केली. वीजदर कमी करण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात दरवाढीचा प्रस्ताव पुढे आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
लोंढे यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील वीज वितरण कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे (एमईआरसी) २० ते ४० टक्क्यांपर्यंत दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रत्यक्षात किमान १६ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असून यामुळे सर्वसामान्य ग्राहकांवर मोठा आर्थिक भार पडेल, असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत वीजदर ५० टक्क्यांनी कमी करण्याचे तसेच पहिल्या वर्षी १० टक्के कपातीचे आश्वासन दिले होते. मात्र सध्याची परिस्थिती या आश्वासनांच्या विरोधात असल्याचे लोंढे यांनी नमूद केले.
तसेच, महाराष्ट्रातील वीजदर शेजारील राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांतील घरगुती व औद्योगिक वीजदर तुलनेने कमी असल्याचे सांगत, “वीज निर्मितीचा खर्च साधारण समान असताना महाराष्ट्रात दर जास्त का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांनाही वाढीव दरांचा फटका बसेल, असे सांगत लोंढे यांनी छोट्या-मध्यम उद्योगांवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली. महागाई व बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर वीजदरवाढ ही सामान्य नागरिकांसाठी आणखी एक आर्थिक झळ ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, वीजदरवाढीच्या प्रस्तावावर एमईआरसीकडे सुनावण्या सुरू असून अंतिम निर्णय आयोगाकडून जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात वीजदराचा मुद्दा येत्या काळात अधिकच गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.














Discussion about this post