‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताबाबत केंद्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने ‘वंदे मातरम्’च्या गायन आणि वादनासाठी नवीन नियमावली जारी केली आहे. गृह मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयानुसार, आता सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम् पूर्णतः सहा कडव्यांसह गाणे अनिवार्य असणार आहे. या संपूर्ण राष्ट्रगीताचा कालावधी 3 मिनिटे 10 सेकंद निश्चित करण्यात आला आहे.
नवीन नियमावलीतील महत्त्वाचे मुद्दे
नवीन प्रोटोकॉलनुसार, राष्ट्रगान “जन गन मन..” च्याआधी राष्ट्रगीत वंदे मातरम्… वाजवले जाईल. वंदे मातरम् सुरू असताना सर्वांना सन्मानाने उभे राहणे बंधनकारक असेल. चित्रपटगृहा यातून वगळण्यात आलं आहे. देशातील सर्व शाळांमध्ये दिवसाच्या कामाची सुरुवात राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने होणे आवश्यक आहे. जर जन-गण-मन आणि वंदे मातरम् एकाच वेळी सादर करायचे असतील, तर प्रथम ‘वंदे मातरम्’ गायले जाईल.
‘वंदे मातरम्’ कधी वाजवले जाईल?
नागरी सन्मान सोहळे: पदवीदान किंवा इतर सरकारी पुरस्कार सोहळ्यांच्या वेळी.
व्हीव्हीआयपी आगमन: राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळी.
राष्ट्रपतींचे संबोधन: आकाशवाणी किंवा दूरदर्शनवरून राष्ट्रपतींचे भाषण सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर.
ध्वजारोहण: परेडमध्ये राष्ट्रीय ध्वज नेला जात असताना किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात ध्वजारोहण करताना.
सामूहिक गायनाचे नियोजन
सार्वजनिक आणि निम-औपचारिक कार्यक्रमांमध्ये जिथे मंत्री उपस्थित असतील, तिथेही हे गीत गायले जाऊ शकते. यासाठी गायक मंडळींची योग्य व्यवस्था करणे. बँड आणि साऊंड सिस्टमची उपलब्धता सुनिश्चित करणे. आवश्यकता असल्यास राष्ट्रगीताच्या लिखित प्रतींचे वाटप करणे असे नियोजन करणे अपेक्षित आहे.
‘वंदे मातरम्’ ऐतिहासिक वारसा
‘वंदे मातरम्’ हे बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या ‘आनंद मठ’ या कादंबरीतून घेण्यात आले आहे. 1896 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात ते पहिल्यांदा गायले गेले होते. 26 जानेवारी 1950 रोजी याला अधिकृतपणे ‘राष्ट्रगीत’ म्हणून घोषित करण्यात आले. स्वातंत्र्यसंग्रामात देशभक्तीची ज्योत पेटवण्यासाठी या गीताने मोठी भूमिका बजावली होती.















Discussion about this post