चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात मोठा आणि धक्कादायक उलथापालथ करणारा निर्णय समोर आला आहे. ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेतील सत्तासमीकरणे पूर्णतः बदलली आहेत. या अनपेक्षित घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला. आज सकाळीच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे संदीप गिऱ्हे यांची बैठक झाली होती. या बैठकीत खटके उडाल्यामुळे संदीप गिऱ्हे रागात बैठकीतून बाहेर पडले होते. त्यानंतर काहीवेळातच भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा केली.
भाजप आणि ठाकरे गटामध्ये चंद्रूपर महानगरपालिकेचे महापौरपद सव्वा-सव्वा वर्षांच्या प्रत्येकी दोन टर्ममध्ये वाटून घेण्याबाबत एकमत झाले. तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे पाच वर्षे उपमहापौर असतील. तर स्थायी समिती ही पहिल्या आणि चौथ्या वर्षासाठी ठाकरे गटाला देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तास्थापनेवरुन वाटाघाटी सुरु होत्या. काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र येऊन भाजपला चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तेपासून दूर ठेवेल, अशी चर्चा होती. संजय राऊत यांनी आज सकाळीच उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपला चंद्रपूर महानगरपालिकेची सत्ता मिळून द्यायची नाही, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा होताच सर्वांनाच धक्का बसला.















Discussion about this post