जळगाव । जळगाव जिल्ह्यात थंडी ओसरत चालली असून हळूहळू उन्हाच्या तडाख्यासह उकाडाही वाढू लागला आहे. दरम्यान जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात १० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याचा अंदाजअसून या कालावधीत आकाश निरभ्र राहणार असून उन्हाचा तडाखा हळूहळू वाढण्याची शक्यता आहे.
विशेषतः सकाळच्या वेळेत थंड व सुखद वातावरण जाणवेल, मात्र दुपारच्या सुमारास तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. दुपारी सूर्यकिरण तीव्र होत असल्याने उष्णतेचा त्रास वाढू शकतो. पुढील काही दिवसांत कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसवर पोहोचण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, बारावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रानंतर तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. पेपर सुटल्यानंतर उन्हात प्रवास करताना विद्यार्थ्यांनी पाणी पिणे, डोके झाकणे आणि शक्यतो उन्हापासून बचाव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सोमवारी जळगाव शहरात कमाल तापमान ३२.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १२.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सध्या रात्री आणि पहाटे गारवा जाणवत असला तरी दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत जाण्याची चिन्हे दिसत आहेत.हवामान कोरडे राहणार असल्याने शेतकऱ्यांसाठी हे वातावरण अनुकूल असले, तरी वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.















Discussion about this post