जळगाव । जळगाव शहरातील गणेश नगर परिसरातील रहिवासी २२ वर्षीय तरुणाचा कांताई बंधाऱ्यावर बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. आशुतोष दिलीप जोशी (वय २२) असं मयत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आशुतोष हा सागर कटारिया, सोमय्या जैस्वाल आणि राहुल चव्हाण या आपल्या मित्रांसोबत कांताई बंधाऱ्यावर जाण्यासाठी निघाला. त्यावेळी त्याचे मामा शिवराज जोशी यांनी त्याला वास्तूशांतीच्या विधीसाठी सोबत येण्याचे सांगत बंधाऱ्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र, आशुतोष आपल्या आग्रहाखातर मित्रांसोबत गेला. आयुष्यात पहिल्यांदाच बंधाऱ्यावर गेलेल्या आशुतोषवर काळाने तेथेच झडप घातली.
धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे नदीला पाणी जास्त होते. आशुतोष छातीपर्यंत असलेल्या पाण्यात अंघोळ करत असताना, त्याला बाजूलाच असलेल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज आला नाही. तो अचानक त्या खड्ड्यात ओढला गेला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच त्याचे मामा शिवराम जोशी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. एकुलत्या एक तरुण मुलाचा असा शेवट झाल्याने आजी आणि मामांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आशुतोषचे आयुष्य संघर्षाने भरलेले होते. तो केवळ २-३ वर्षांचा असतानाच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले होते. तेव्हापासून त्याची आजी आणि मामा यांनीच त्याचा सांभाळ करून त्याला मोठे केले होते. अत्यंत मनमिळावू आणि धार्मिक प्रवृत्तीचा असलेला आशुतोष सर्वांचा लाडका होता.















Discussion about this post