जळगाव । जळगाव शहर महापालिकेत महायुतीला बहुमत मिळाले आहे. यानंतर महापौर पदासाठी ओबीसी महिला साठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर जळगावचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. अशातच जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीच्या हालचालींना आता वेग आला आहे.
महानगरपालिकेतील नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर निवडीसाठीचा अधिकृत कार्यक्रम राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त यांना पत्र लिहून, महापौर व उपमहापौर निवडीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ३० व ३१ जानेवारी २०२६ पैकी विशेष सभेची तारीख, वेळ आणि पीठासीन अधिकारी निश्चित करण्याची विनंती केली आहे. यापैकी नेमकी कोणत्या दिवशी निवड होणार आणि पीठासीन अधिकारी कोण असणार हे विभागीय आयुक्त ठरविणार आहेत.
२७ व २८ जानेवारी रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल
महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक नवनिर्वाचित नगरसेवकांना २७ किंवा २८ जानेवारी रोजी नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ३० किंवा ३१ जानेवारी रोजी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक घेऊन मतदानाद्वारे महापौर व उपमहापौरांची निवड करण्यात येणार आहे.
महापौर पदासाठी यांचे नाव आघाडीवर
दरम्यान, महापालिकेतील भाजपकडून तीन ओबीसी महिलांचे नाव समोर येत असून, यात भाजपचे ज्येष्ठ नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला काळे यांचे नाव पुढे आहे. तर नवीन व मराठा चेहरा म्हणून वैशाली पाटील यांचे नाव समोर येत आहे. त्यामुळे महापौरपद मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे.















Discussion about this post