मुंबई । महाराष्ट्रात यंदाची थंडी हाड गोठवणारी ठरली. मात्र मागच्या काही दिवसापासून थंडी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच दिवसांत वातावरणात देखील बदल जाणवत आहेत. सकाळी काही अंशी थंडी त्यानंतर ढगाळ वातावरण होत आहेत. त्यामुळे आता पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील हवामान नेमके कसे असणार आहे, याविषयी हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या सक्रियपट्ट्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आल्या होती. दुसरीकडे उत्तरेतील पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तरप्रदेश या राज्यात दाट धुके असणार आहेत. दक्षिण आणि उत्तरेत तयार झालेल्या या वेगळ्या हवामान परिस्थितीचा महाराष्ट्रावर परिणाम झाला आहे.
राज्यातील गेल्या काही दिवसांपासून पसरलेली कडाक्याची थंडी ओसरली असून, मुंबईसह, ठाणे, संभाजीनगरमध्ये संक्रांतीच्या पूर्वसंध्येला पाऊसाने हजेरी लावली आहे. आता पुढील 24 तासात महाराष्ट्रात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, मात्र त्यानंतर तापमानात लक्षणीय घट होणार असल्याचा अंदाज आहे. दोन ते तीन अंशांनी तापणात घट होणार असून, पुन्हा थंडी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तसेच या काळात राज्यात जोरदार पावसाची शक्यता नसली तरी काही ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो, असे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे दक्षिण भारतात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील थंडीची लाट ओसरली असली तरी मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर कायम आहे.















Discussion about this post