मुंबई । महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार अशी हुरुहूर इच्छुकांना लागली आहे. कोर्टाने जानेवारीमध्ये निवडणुका घ्याव्या, असा आदेश दिला होता. मात्र कालच सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद निवडणुकींसाठी १५ दिवसांचा अतिरिक्त वेळ दिलाय.
दरम्यान, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत असणाऱ्या प्रलंबित १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका आज जाहीर होऊ शकतात. राज्य निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांनी वर्तवली आहे. आयोगाकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच १२ जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू होणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक?
आज निवडणूकीचा कार्यक्रम प्रसिध्द होऊ शकतो. आजपासूनच आचारसंहिता लागू असेल.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी – १९ जानेवारी ते २८ जानेवारी
नामनिर्देशनपत्रांची छाननी – २९-३० जानेवारी
उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक – २ फेब्रुवारी
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक – ३ फेब्रुवारी
मतदानाचा दिनांक – १२ किंवा १३ फेब्रुवारी
मतमोजणी – १४ फेब्रुवारी २०२६
कोणत्या १२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार ?
जळगावसह लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. १२ जिल्हा परिषदेचे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत आहे, त्यामुळे निवडणुका घेण्यात येणार आहेत. उर्वरित २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत.















Discussion about this post