मुंबई । मनसेकडून मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या संतोष धुरी मनसेला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेतले. त्यानंतर मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, या सर्व चर्चांना आता संदीप देशपांडे यांनीच पूर्णविराम दिला आहे.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
संदीप देशपांडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “गेल्या अनेक दिवसांपासून मी मनसेमध्ये नाराज असल्याच्या आणि पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या बातम्यांना मी आज पूर्णविराम देत आहे. मी मनसेमध्ये आहे आणि पक्षाचे काम प्रामाणिकपणे करत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, यासाठी मी पूर्णपणे झटत आहे आणि पुढेही झटेन.”
देशपांडे यांनी पक्षनिष्ठेवर भर देताना पुढे म्हटले, “जोपर्यंत पक्षाला माझी गरज आहे असे मला वाटेल, तोपर्यंत मी मनसेतच राहीन. मात्र, ज्या क्षणी मला वाटेल की मी पक्षासाठी अॅसेट (मालमत्ता) न राहता लायबिलिटी (ओझे) झालो आहे, त्या क्षणी मी वेगळा निर्णय घेईन.” या विधानातून देशपांडे यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चा थांबवल्या असल्या तरी भविष्यातील परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची मोकळीकही ठेवली आहे.
मनसेच्या मुंबईतील राजकारणात संदीप देशपांडे हे महत्त्वाचे नाव आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नाराजी आणि पक्षांतराच्या बातम्या मनसेच्या प्रचारावर परिणाम करू शकतात, असे मानले जात आहे. संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशानंतर देशपांडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता देशपांडे यांच्या स्पष्ट विधानामुळे मनसेला काहीसा दिलासा मिळाला असून, पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये एकजूट निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















Discussion about this post