जळगाव । उत्तरेकडून येणारे शीत वारे वेगाने वाहत असल्याने महाराष्ट्रात पारा सातत्याने घसरताना दिसत असून यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. जळगावमध्ये पारा ७ अंशाच्या खाली आल्याने जळगावकर गारठले आहे. आजही जळगावसह राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील अनेक शहरांचा किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली अलायने थंडी वाढली. काल म्हणजेच शुक्रवारी जेऊर राज्यातील निचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणीत ५.५ अंश, निफाड मध्ये ५.७ अंश सेल्सिअस, धुळे आणि अहिल्यानगर येथे प्रत्येकी ६.१, जळगाव येथे ६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगर, नाशिक येथे ८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी, पुणे, मालेगाव, गोंदिया, यवतमाळ येथे ९ अंशांपेक्षा कमी, सातारा, वाशीम, भंडारा आणि नागपूर येथे १० अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.
किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीचा लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. शुक्रवारी जेऊर, धुळे, निफाड, जळगाव, अहिल्यानगर, परभणी, यवतमाळ येथे कडाक्याची थंडी होती. आज राज्यातील थंडीची लाट कमी होण्याची शक्यता आहे. मात्र हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील तापमान पुढीलप्रमाणे : –
पुणे :- ८.३ अंश सेल्सियस
अहिल्यानगर :- ७.३ अंश सेल्सियस
धुळे :- ६.१ अंश सेल्सियस
जळगाव:- ६.९ अंश सेल्सियस
जेऊर:- ५.० अंश सेल्सियस
कोल्हापूर:- १३.५ अंश सेल्सियस
महाबळेश्वर: – १२.२ अंश सेल्सियस















Discussion about this post