मुंबई । डिसेंबरचा शेवटचा महिना आजपासून अनेक मोठ्या बदलांसह सुरू झाला आहे. एलपीजी वापरकर्त्यांना पहिल्याच दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. खरंतर, देशभरात एलपीजी सिलिंडरच्या किमती १ डिसेंबर २०२५ पासून कमी करण्यात आल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये १० रूपयांची कपात करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे घरगुती सिलिंडरच्या किंमती जैसे थे आहेत, दरांमध्ये कोणतीही वाढ अथवा कपात करण्यात आलेली नाही.
आजच्या दर कपातीनंतर दिल्लीमध्ये १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरची किंमत आता १५९० ऐवजी १५८० झाली आहे. कोलकातामध्ये किंमत देखील १० रुपयांनी कमी झाली आहे, १६९४ वरून १६८४ प्रति सिलिंडर झाली आहे. इतर महानगरांबद्दल बोलायचे झाले तर, मुंबईत व्यावसायिक सिलिंडर १५४२ रुपयांवरून १५३१ रुपयांना उपलब्ध होईल, तर चेन्नईमध्ये त्याची किंमत १७५० रुपयांवरून १७३९ रुपये करण्यात आली आहे.
यापूर्वी, १ नोव्हेंबर रोजी सर्व शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. आता, सलग दुसऱ्या महिन्यात किमती कमी झाल्या आहेत. तथापि, १ नोव्हेंबर रोजी, दिल्लीमध्ये १९ किलोच्या सिलिंडरची किंमत ₹१५९५.५० वरून ₹१५९०, कोलकातामध्ये ₹१७००.५० वरून ₹१६९४, मुंबईत ₹१५४७ वरून ₹१५४२ आणि चेन्नईमध्ये ₹१७५४.५० वरून ₹१७५० करण्यात आली.
१४.२ किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. सध्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत अद्याप ८५३ रुपये इतकी आहे.















Discussion about this post