जळगाव । वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या जळगाव शहरातील तरुणाने मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. डॉ. आदिनाथ संजय पाटील (२७, रा. जळगाव, गणेश नगर) असे मयत झालेल्या तरुण डॉक्टरचे नाव असून आत्महत्या मागील कारण अद्यापही कळू शकले नाही.
डॉ. आदिनाथ पाटील हा केईएम रुग्णालयाच्या औषधविभागशास्त्र विभागांतर्गत पदव्युत्तर शिक्षण घेत होता. तो डॉ. संजय पाटील व डॉ. स्मिता पाटील यांचा चिरंजीव आहे. दरम्यान, आदिनाथ हा काही दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयातील महिला आणि पुरुषांचा वॉर्ड शिवडी टीबी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आला आहे. त्यानंतर, आदिनाथ दोन्ही ठिकाणी उपचार करीत होता.
याच दरम्यान, ऑनड्युटी असताना त्याने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे ओपीडीला न आल्याने त्याच्यासोबतच्या डॉक्टरांनी खोलीचा दरवाजा ठोठावला. त्याने, दरवाजा उघडला नाही म्हणून परिचारिकेने मागच्या बाजूने दरवाजा उघडला. तेव्हा तो मृतावस्थेत आढळला. अत्यंत हुशार आणि हसमुख विद्यार्थी अशी आदिनाथची ओळख होती. नीट परिक्षेतदेखील त्यांनी जिल्ह्यात स्थान मिळविले. त्याचा भाऊदेखील केईएममध्ये शिकत असल्याची माहिती मिळाली.