चोपडा । ट्युशनला जात असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला एसटी बसने जोरदार धडक दिल्याने जय प्रदीप महाजन (वय १५, रा. अकुलखेडा) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही भीषण घटना सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता चोपडा तालुक्यातील अकुलखेडा गावाजवळ घडली आहे. या दुर्घटनेत नील हर्षल पाटील हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे अकुलखेडा गावात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेबाबत असे की, जय महाजन हा अकुलखेडा गावात परिवारासह राहत होता. दहावीचे शिक्षण घेत असलेला जय, नेहमीप्रमाणे आपला वर्गमित्र नील पाटील याच्यासोबत सोमवारी पहाटे ५.३० वाजता दुचाकी क्र. (एमएच १९ एयु ३०५८) वरून चोपडा येथे ट्युशनसाठी जात होता. अकुलखेडा गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर, समोरून चुकीच्या मार्गाने भरधाव वेगाने येणाऱ्या बस क्र. (एमएच १४ बीटी २०८३) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, जय आणि नील दोघेही गंभीर जखमी झाले.
दोन्ही जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराला सुरुवात होण्यापूर्वीच जय महाजन याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नील पाटील याच्यावर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेमुळे रुग्णालयात जयच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा पहाटे अपघातात झालेला मृत्यू ही घटना अत्यंत दुःखद आहे.















Discussion about this post