भुसावळ । सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना डिसेंदिवस वाढत चालले असून अशातच भुसावळ शहरातील एका प्रतिष्ठित वकिलाची शेअर्स ट्रेडिंगमधील आकर्षक गुंतवणुकीवर जास्त परताव्याचे आमिष दाखवून तब्बल २१ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, ॲड. विवेक पाटील (४९) नेहमीप्रमाणे फेसबुक स्क्रोल करत असताना शेअर्स ट्रेडिंगमधील आकर्षक गुंतवणुकीची एक जाहिरात दिसल्याने त्यांनी उत्सुकतेपोटी त्यावर क्लिक केले होते. फेसबुकवरील जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर लगेचच त्यांना टेलिग्रामवर संपर्क साधण्यास सांगण्यात आले. लिंक उघडताच पाटील यांना ‘अभय’ नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला. अभयने स्वतःला शेअर ट्रेडिंग तज्ज्ञ म्हणून ओळख करून देत गुंतवणुकीसंदर्भात माहिती दिली. तसेच नवीन टेलिग्राम खाते तयार करण्याचे निर्देश दिले. ॲड. पाटील यांनी त्या खात्यावर आलेल्या संदेशांनुसार स्वतःची वैयक्तिक माहिती दिली. त्यानंतर ‘नोमन’ नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. त्याने स्वतःची कंपनीचा वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून ओळख दिली आणि गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सुरुवातीला १९ हजार १६३ रुपये जमा करण्यास सांगितले. गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याची हमी दिल्याने पाटील यांनी पहिली रक्कम लगेच भरली.
फसवणूक करणाऱ्यांच्या सांगण्यावरून ॲड. पाटील यांनी त्यांच्या बँक खात्यातून अनेक हप्त्यांमध्ये २१ लाखांपेक्षा अधिक रक्कम भरली. प्रत्येक व्यवहारामागे नवे कारण सांगितले जात होते. कधी प्लॅटफॉर्म फी, कधी अपग्रेड चार्ज, तर कधी ट्रेडिंग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली अनिवार्य रक्कम, असे सांगून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली गेली. गुंतवणूक केलेली रक्कम परत घेण्याचा प्रयत्न करताच संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. ॲड. पाटील यांनी अभय आणि नोमन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, दोघांनीही प्रतिसाद देणे बंद केले. नंतर संपर्क साधला तेव्हा त्यांना सांगण्यात आले की, ती रक्कम आता ट्रेडमध्ये अडकली आहे आणि काढता येणार नाही. या उत्तरामुळे संशय वाढल्याने पाटील यांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
दरम्यान, सायबर गुन्हेगारी वाढत असताना सोशल मीडियावरील कोणत्याही आकर्षक आर्थिक ऑफरवर विश्वास ठेवण्यापूर्वी नीट पडताळणी करणे अत्यावश्यक असल्याची सूचना पोलिसांनी केली आहे. नागरिकांना सोशल मीडियावरील गुंतवणूक ऑफर, अनोळखी लिंक आणि जास्त परताव्याच्या वचनांपासून सावध राहण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.















Discussion about this post