नाशिक । राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून यातच राजकीय पक्षांतराचे वारेही जोरदार वाहू लागले आहे. दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला खिंडार पडलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह गुरुवारी (१३ नोव्हेंबर) अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नाशिक येथील वसंत स्मृती कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
कोतवाल यांच्यासोबतच माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, माजी नगरसेविका नंदिनी बोडके, युवा नेते नरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव गोवर्धने आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या महत्त्वपूर्ण प्रवेशामुळे नाशिक आणि विशेषतः चांदवड तालुक्यात भाजपला मोठे राजकीय बळ प्राप्त झाल्याचे मानले जात आहे.
“हा तुमचा शेवटचा पक्षप्रवेश असेल” – मंत्री गिरीश महाजन
यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिरीषकुमार कोतवाल यांचे पक्षात स्वागत केले. “शिरीषभाऊ, आजपासून तुम्ही अधिकृतपणे भाजपवासी झाला आहात. देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात तुम्ही सामील झाला आहात. आता यापुढे कुठेही जाण्याची वेळ येणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “भाजपमध्ये तुम्हाला काम करण्यासाठी मोठा वाव असून, आम्ही तुमच्या सर्व अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असे आश्वासन महाजन यांनी दिले. तसेच, “आतापर्यंत तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काम केले. आठ वेळा आमदारकीची निवडणूक लढवली आहे, पण आता हा तुमचा शेवटचा पक्षप्रवेश आहे आणि भाजपमध्ये तुम्हाला योग्य स्थान मिळेल,” असे सूचक विधानही त्यांनी केले.















Discussion about this post