जळगाव । अवैध दारू अड्ड्यांवर गोळीबाराच्या दोन घटना घडल्यामुळे जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपद्रवींसह संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर जळगाव पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला आहे. अपर पोलिस अधीक्षकांनी स्वतः क्यूआरटी आणि आरसीपी पथकाने ११ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजेपासून ते मध्यरात्री १२.३० पर्यंत विशेष मोहीम राबवली.जळगाव शहर, एमआयडीसी आणि शनिपेठ या तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत राबवलेल्या मोहिमेत एकूण २५ संशयितांवर विविध कायद्यात प्रतिबंधात्मक कारवाई करून अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
या ऑपरेशनमध्ये एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक तर ४ जणांविरुद्ध मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई झाली. शिवाजीनगर रस्त्यावर भिंतीलगत एक जण देशी दारूची अवैध विक्री करीत होता. त्याच्यावर कारवाई करून ५६० रुपयांची दारू जप्त केली. दूध फेडरेशनजवळ विकास बियर शॉपीमध्ये विनापरवाना देशी दारूची विक्री करणाऱ्यावर पथकाने छापा टाकला. त्याच्याकडून १६ हजार ४६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.















Discussion about this post