जळगाव : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधील अनेक माजी मंत्री व माजी आमदार यांच्यासह नेत्यांनी पक्षातून काढता पाय घेतला आहे. यातून पक्ष सावरला नसतानाच आता शरद पवार यांचे कट्टर समर्थक व निष्ठावंत समजले जाणारे विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी देखील पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. अरुण भाई गुजराती हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अरुण गुजराथी हे देखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी होती. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही जाणाऱ्यांना जाऊ द्या, असे म्हणत त्यावेळच्या चर्चांना अप्रत्यक्ष दुजोरा दिला होता. मात्र, त्यावेळी खुद्द गुजराथी यांनी स्पष्ट केले होते की, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मला आजवर भरपूर दिले आहे. त्यामुळे त्यांना सोडून जाण्याचा किंवा दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. आता मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते कोणत्याही पक्षात असले तरी, मी फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणार आहे. असं म्हटलं होते. गुजराथी यांनी आता शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी जळगाव दौऱ्यावर आल्यावर गुजराथी यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाचा थेट दावाच केला आहे. आज मंगळवारी अरुण गुजराथी मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी यांनी सांगितले.
मंत्री कोकाटे म्हणाले की, जळगाव व भुसावळ या ठिकाणी आजी व माजी आमदार खासदार यांच्या मतदारसंघनिहाय मुलाखती घेतल्या. ज्यांची तेवढी ताकद आहे, त्याप्रमाणे त्यांच्याशी युती होणार आहे. हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येणार आहे. यावेळी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्यावर कोणत्याही चर्चा झाल्या नाहीत.















Discussion about this post