जळगाव । जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक अमजद खान असलम खान यांना सेवेत हलगर्जीपणा आणि कार्यातील अनास्था दाखवल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी आदेश जारी केले आहेत.
अमजद खान हे वैद्यकीय देयकांचे कार्यासन सांभाळत असताना, विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने शासनाकडे पाठविण्यात येणाऱ्या वैद्यकीय देयकावर मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी यांचा आवश्यक अभिप्राय न घेता थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी देयक सादर करण्यात आले. तसेच संबंधित कामकाज वेळेत पूर्ण न करणे आणि अपूर्ण ठेवणे असे गंभीर निष्काळजीपणाचे प्रकार त्यांच्याकडून आढळून आल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात नियमबाह्य वर्तन आणि प्रशासकीय प्रक्रियांचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिस्तभंगात्मक कारवाईचा भाग म्हणून अमजद खान यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या कारवाईबाबत सांगितले, जिल्हा परिषदेच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि शिस्त ही अत्यावश्यक आहे. कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा किंवा नियमभंग सहन केला जाणार नाही. या निर्णयातून जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शिस्तपालनाचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.















Discussion about this post