महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आगामी दहावी आणि बारावी परीक्षांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे राज्याच्या शिक्षण इतिहासात प्रथमच प्रत्येक परीक्षा केंद्रातील वर्गात सीसीटीव्ही कॅमेरा असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच परीक्षेच्या दिवशीचे संपूर्ण रेकॉर्डिंग पुढील 30 दिवसांपर्यंत सुरक्षित जतन करणे आवश्यक असेल, असा निर्णय देखील घेण्यात आला आहे. दहावी-बारावी परीक्षांमध्ये कॉपी टाळण्यासाठी बोर्डाने हा अत्यंत कठोर आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे की, कॉपीच्या घटनांना सख्त पायबंद घालण्यासाठी ही पाऊले उचलली गेली आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांना थेट मान्यता रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रत्येक परीक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेरा असणे आवश्यक आहे. या रेकॉर्डिंगचा उपयोग गैरप्रकार झाल्यास पुरावा म्हणून केला जाईल.
15 नोव्हेंबरपासून परीक्षा केंद्रांची पडताळणी
पुणे विभागीय बोर्डाचे अध्यक्ष औदुंबर उकीरडे यांनी सांगितले की, “ज्या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, पक्की संरक्षक भिंत आणि स्वच्छतागृह अशा महत्त्वाच्या सुविधा नसतील, त्या केंद्रांची मान्यता तत्काळ रद्द होईल. तसेच संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे विशेष नजर ठेवली जाणार आहे. याशिवाय परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू केले जाईल. मंडळाकडून 15 नोव्हेंबर पासून सर्व परीक्षा केंद्रांची पडताळणी केली जाईल.
मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांमध्ये एकाच वेळी परीक्षा पार पडतील. बारावी (HSC) बोर्डाची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान घेण्यात येणार आहे, तर दहावी (SSC) बोर्डाची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 होणार आहे. लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा घेतल्या जातील.















Discussion about this post