आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षानं कंबर कसली असून मात्र याच दरम्यान पक्षांतराचे वारेही जोरदार वाहताना दिसत आहे. आगामी निवडणुकीपूर्वी नांदेडमध्ये अजितदादांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण बड्या नेत्यासह ३७ जणांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
नांदेडच्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढणार आहे. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांच्यासह मोठा गट काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश कऱणार आहे. सुमठाणकर यांच्यासह एकूण ३७ जण काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत.
४ माजी नगराध्यक्ष, २३ माजी नगरसेवक, ८ नगरसेवक, २ माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी पंचायत समिती सभापती, माजी पंचायत समिती सदस्य काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. हा पक्षप्रवेश सोहळा २८ ऑक्टोबर रोजी नांदेडच्या देगलूर येथे पार पडणार आहे. हा पक्षप्रवेश सोहळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
या सर्वांच्या पक्षप्रवेशाने नांदेडच्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये होणारी ही इनकमिंग या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला उभारी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.















Discussion about this post