जळगाव । जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. कारण पाचोरा – भडगावचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्याने आता भाजपच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांनी तातडीने बैठक घेऊन भाजपही स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणुका घोषित होण्यापूर्वीच पाचोरा मतदारसंघात युती फिसकटली असून युतीत निवडणुका न लढण्याचा निर्णय घेणारा पाचोरा मतदारसंघ हा राज्यात पहिला ठरला आहे.
महायुतीच्या मंत्र्यांमध्ये वर्चस्वावरून मतभेद वाढू लागले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधीच महायुतीत फटाके वाजले. किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदार संघात कोणाशीही युती न करण्याची भूमिका घेतली. यानंतर पाचोरा, भडगाव मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हीही एकटे लढणार आहोत. अशी भूमिका भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मांडली आहे.
राजकारणात कोणी कोणाचं मित्र आणि शत्रू नसतं. राजकारणात आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो, तो परवाचा मित्रही असू शकतो. राजकारण हे हरिभक्त पारायणचे काम नाही, राजकारणात कोणीतरी शत्रू राहील, कुणीतरी सोबत राहणार. किशोर पाटील आणि मी सरकारमध्ये आहे, महायुतीचा घटक आहे. एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांच्याविषयी अगदी टोकाचे बोलणं मला योग्य वाटत नाही. किशोर पाटील यांनीही काही गोष्टी सांभाळून बोलल्या तर बरं होईल. विधानसभेला त्यांचा फॉर्म भरायला मी ज्युनिअर आमदार असताना आलो होतो. ते एकही उदाहरण दाखवू शकत नाही की आम्ही त्यांच्या विरोधात भूमिका घेतली. असे म्हणत भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना टोला लगावला.














Discussion about this post