पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून (ता. १५) सुरू होणार आहे. याबाबतची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी सावधगिरी बाळगून, नाव, विषयांची निवड, फोटो, स्वाक्षरी अशा सर्व बाबी काळजीपूर्वक तपासून घ्याव्यात, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
या वर्षीही दहावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ‘युडायस प्लस’मधील पेन-आयडीवरून त्यांच्या शाळांमार्फत भरले जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याचा पेन-आयडी क्रमांक वेगळा असल्याने त्याद्वारे सर्व माहिती थेट मंडळाच्या डेटाबेसशी जोडली जाईल. यामुळे अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता व गती येणार असून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही.
फक्त नियमित विद्यार्थीच नव्हे, तर पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच मोजके विषय निवडणारे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थीही यामध्ये समाविष्ट आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in उपलब्ध होणार असून, संबंधित शाळा प्रमुखांनी हे अर्ज वेळेत ऑनलाइन भरून घेणे आवश्यक असल्याचं मंडळाने सांगितलं आहे.
मंडळाने स्पष्ट केले आहे की, अर्ज भरण्याची मुदत १५ सप्टेंबरपासून ६ ऑक्टोबरपर्यंत असेल. या परीक्षेची फी १५०० इतकी आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी कोणत्याही कारणास्तव विलंब न करता अर्ज भरून पूर्ण करावेत. यानंतर उशिरा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे शाळा प्रमुखांवर वेळेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी येणार आहे.















Discussion about this post