मुंबई । मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे तसेच इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानावर दाखल होत उपोषणाला सुरूवात केली. उपोषण सुरू करताना त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी सर्व मराठा बांधवांना शांत राहण्याचे आवाहन केले. ‘सरकारने सहकार्य केले आणि आपणही त्यांना सहकार्य करू. कुणीही जाळपोळ आणि दगडफेक करायची नाही. पोलिस बांधवांना सहकार्य करा.’, असे सांगत मनोज जरांगे यांनी सर्वांना संयम ठेवण्यास सांगितला आहे. मागणी मान्य होईपर्यंत मुंबई सोडायची नाही, असे देखील मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. ही परवानगी फक्त एका दिवसापुरती असून सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच आंदोलनाला मुभा राहील. त्यानंतर कोणीही आंदोलनकर्ते मैदानात थांबू शकणार नाहीत, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे.
दरम्यान मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला सुरूवात केली असून यावेळी त्यांनी सांगितले की, ‘आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं. तुम्हाला मला एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलोय. गडबड गोंधळ करू नका. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपल्याला ७० वर्षे काही मिळाले नाही. आपला समजात कसा मोठा करता येईल, त्यासाठी आपल्याला पर्यत्न करायचे आहेत.’ आता तुमची काय जबाबदारी आहे. सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हते म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि मुंबई जाम करणार होते आणि मुंबई जाम केली पण. आता सरकारने आपल्याला सहकार्य केले आहे परवानगी दिली. त्याबद्दल आपण सरकारचे कौतुकही केले.
आरक्षण घेतल्याशिवाय इथून हालणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. ते म्हणाले की, ‘डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचे नाही. मराठ्यांची मान खाली जाईल, असे कुणीही वागायचे नाही. कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. समाजाला कुटुंब मानलेय. मी तुमच्या कुटुंबातील आहे, तर माझा शब्द खाली पडू देऊ नका. मी कुटुंबासाठी लढतोय. माझ्या कुटुंबाची राखरांगोळी झाली तरी चालेल, पण समाज उभा राहिला पाहिजे. जे मैदान दिलेय, तिथेच राहायचे अन् झोपायचे. मी आझाद मैदानावर आहे, म्हटल्यावर तुम्ही घरात निवांत झोपा.’















Discussion about this post