जळगाव । धावत्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. शेगाव ते जळगाव प्रवासादरम्यान हा भयंकर प्रकार घडला. या घटनेनंतर महिला एक्स्प्रेसमध्येही असुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. पीडित महिला आपल्या पती आणि कुटुंबियांसोबत असूनही हा भंयकर प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करीत पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन असल्याची माहिती आहे. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
भुसावळमध्ये धावत्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी तक्रारदार महिला आपल्या पती आणि कुटुंबीयांसह शेगावहून जळगावकडे जनरल डब्यातून प्रवास करीत होती. डब्यात प्रचंड गर्दी असल्याचा फायदा घेत संशयितांनी पीडित महिला आणि तिच्या नातेवाईकांशी अश्लील वर्तन केलं.
एवढंच नव्हे तर तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या महिलेलाही त्रास दिला. दरम्यान, गाडी भुसावळ स्थानकात पोहोचताच महिलेच्या नातेवाईकांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर इतर प्रवाशांच्या मदतीने पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींमध्ये २ अल्पवयीन असल्याची माहिती आहे. या प्रकरणी शेगाव रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरूआहे.















Discussion about this post