धुळे । धुळे शहरातील गजानन कॉलनी येथील श्री गजानन महाराज मंदिरातून दानपेटी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना चाळीसगाव रोड पोलिसांनी अवघ्या सहा तासांत गजाआड केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक चोरीची मोटारसायकल असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या घटनेबाबत असे की, मंदिरातील दानपेटी तसेच देवाच्या अंगावरील दागिने चोरी करण्याकडे चोरट्यानी मोर्चा वळविला आहे. रात्रीच्या अंधारात सुमसाम असलेल्या मंदिरात प्रवेश करत चोरटे चोरी करून पसार होत आहेत. अशीच घटना धुळे शहरातील गजानन कॉलनीत घडली आहे. या परिसरातील गजानन महाराज मंदिरात दोघांनी प्रवेश करत मंदिरात असलेली दानपेटी चोरून नेली होती. दरम्यान सकाळी भाविकांच्या हा प्रकरण लक्षात आला होता.
यासंदर्भात फिर्याद मिळाल्या नंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. यानंतर गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अरिहंत मंगल कार्यालयाजवळ सापळा रचून मोटारसायकलवरून पळून जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून त्यांना शिताफीने पकडले. साहिल सत्तार शाह व सोहेल आरिफ शाह अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून मंदिरातून चोरलेली दानपेटी आणि गुन्ह्यात वापरलेली एक चोरीची मोटारसायकल असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.















Discussion about this post