उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती
मुंबई l राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली असून, अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष निवड करण्यासाठी गुणवत्ताधारित नवीन कार्यपद्धती लागू करण्यात येणार आहे. यामुळे विद्यापीठांतील भरती प्रक्रियेचा वेग वाढेल आणि गुणवत्ताधिष्ठित प्राध्यापकांची निवड होईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, मा. राज्यपाल आणि कुलपती यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यातील विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या निवड प्रक्रियेसाठी गुणांकन प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. या प्रणालीत शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीमधील कामगिरी या दोन्ही घटकांना महत्त्व दिले जाणार आहे.
नवीन कार्यपद्धतीनुसार, शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापन या निकषांना ८० टक्के गुण (वेटेज) दिले जातील, तर मुलाखतीसाठी २० टक्के गुण राखीव असतील. एकत्रित १०० गुणांपैकी किमान ५० टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांनाच अंतिम निवडीसाठी पात्र ठरविले जाईल.
मुलाखतीदरम्यान उमेदवारांच्या अध्यापन क्षमतेचे आणि संशोधन प्राविण्याचे मूल्यमापन परिसंवाद (seminar), व्याख्यान प्रात्यक्षिक (lecture in a classroom situation) आणि अध्यापन व संशोधन क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेच्या आधारे करण्यात येईल.
निवड समितीच्या बैठकीचे दृक-श्राव्य चित्रिकरण केले जाणार असून, निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीसह सीलबंद केले जाईल. तसेच, मुलाखती पूर्ण होताच त्याच दिवशी किंवा त्यानंतरच्या दिवशी निकाल जाहीर करण्यात येईल.
ही सुधारित प्रक्रिया सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी लागू राहील. विद्यापीठांमध्ये सध्या सुरू असलेल्या निवड प्रक्रियांना देखील यानुसार मान्यता देण्यात आली आहे.
या नव्या कार्यपद्धतीमुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल, गुणवत्ता महत्त्वाची ठरेल आणि उच्च शिक्षणाच्या स्तरात लक्षणीय वाढ होईल, असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.















Discussion about this post