संभाजीनगर : ‘ऑनर किलिंग’च्या घटनेने छत्रपती संभाजीनगर हादरले आहे. मित्रासोबत पळून गेलेल्या अल्पवयीन चुलत बहिणीला समजावण्याच्या बहाण्यानं डोंगरावर फिरायला नेऊन तिला दरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडला. नम्रता गणेशराव शेरकर (१७ वर्ष, रा. शहागड, श्रीराम कॉलनी ता. अंबड जि.जालना) असे मृत मुलीचे नाव असून चुलत भावाचे नाव ऋषिकेश तान्हाजी शेरकर (वय, २५ रा. वळदगाव ) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नमृताचे गावाकडे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण होते. दरम्यान काही दिवसापूर्वी ती घर सोडून गेली होती. यामुळे घरच्यांनी पाच -सहा दिवसापूर्वी नम्रताला वळदगाव येथे राहणाऱ्या चुलत्याकडे पाठवले होते. नम्रताचा चुलत भाऊ ऋषीकेश नमृताला बाहेरून जाऊन येवू, असे म्हणून तो तिला खवड्या डोंगरावर घेऊन गेला. याठिकाणी तिच्यासोबत गप्पा मारता-मारता ऋषिकेश याने नम्रताला डोंगरावरून खाली ढकलून दिले. जवळपास २०० फुटावरून खाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छदानासाठी रुग्णालयात पाठविला असून संशयित आरोपी ऋषीकेश शेरकर यास ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान १७ वर्षीय नम्रता शेरकर हिचे एका आंतरजातीय तरुणावर प्रेम होते. याला कुटुंबीयांचा विरोध होता. काही दिवसांपूर्वी ती घर साेडून गेली होती. कुटुंबियांनी नम्रताची समजूत काढली. तिला पुन्हा घरी आणलं होतं. ती आंतरजातीय विवाहावर ठाम हाेती. काही दिवसांपूर्वी तिला वळदगाव येथे तिच्या चुलत्याकडे राहण्यासाठी पाठविले होते. नम्रतानेआंतरजातीय विवाह केल्यास आपल्या कुटुंबाची मानहानी होईल, या विचारातून चुलत भाऊ ऋषीकेश शेरकर याने केलेल्या कृत्याने छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरला आहे.















Discussion about this post