जळगाव । सामाजिक, विषयांवर मुकनाट्याद्वारे केलेले भाष्य , सुप्रसिध्द कलावंतांची मिमिक्री, राष्ट्र प्रेमाने भारावत सादर केलेले समुहगान, सुरवाद्य व तालवाद्यावर असलेली हुकमत आणि चित्र, व्यंगचित्राद्वारे केलेले कलात्मक सादरीकरण यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात सुरू असलेला युवारंग युवक महोत्सव विशेष रंगला.
विद्यार्थी विकास विभागाव्दारा आयोजित आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात पाचही रंगमंचांचे उद्घाटन करण्यात आले. या पाचही रंगमंचांवर विविध सादरीकरण करण्यात आले त्यात वक्तृत्व, मिमिक्री, भारतीय समुहगान, भारतीय शास्त्रीय वाद्यसंगीत (स्वरवाद्य), तालवाद्य, व्यंगचित्र, मूक अभिनय व स्थळचित्र यांचे सादरीकरण करतांना प्रेक्षकांसह परीक्षकांना देखील खिळवून ठेवत शाबासकीची थाप स्पर्धकांनी मिळविली. यात सामाजिक, देशभक्ती, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, अंधश्रध्दा, वाहतूक, अपघात असे रोजच्या धकाधकीच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांचे सादरीकरण यामुळे प्रेक्षक व परीक्षक भारावून गेले. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, नितीन झाल्टे आदींनी सर्व रंगमंचावर भेट देवून कलावंत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

या युवारंग स्पर्धेची थिम स्त्री सक्षमीकरण अशी आहे. त्याकरीता विद्यापीठाने पाचही रंगमंचांना क्रांतीकारी स्त्रीयांची नावे दिली आहेत. रंगमंच क्र. १ ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देतांना तेथे किल्याचा देखावा करून अहिल्यादेवी यांच्या जीवनपटाची थोडक्यात माहिती नमूद केली आहे. रंगमंच क्र. २ येथे राजमाता जिजाऊ यांचे सभागृहाला नाव देत असताना त्याठिकाणी देखील जिजाऊंच्या कामगिरीचा उल्लेख असलेला किल्ला सदृश्य देखावा उभा केला आहे. रंगमंच क्र. ३ ताराराणी सभागृह किल्ला सदृश्य प्रतिमा लावून सुशोभित केला आहे. या ठिकाणी देखील ताराराणी यांनी केलेल्या कर्तबगारीचा थोडक्यात उल्लेख केला आहे. रंगमंच क्र. ४ हा राणी लक्ष्मीबाई यांच्या नावाने तयार केला असून या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई यांच्या लढवय्या कामगिरीचे वर्णन नमूद करून किल्ला सदृश्य देखावा उभा केला आहे. रंगमंच क्र. ५ हा राणी दुर्गावती यांनी केलेल्या क्रांतीकारी कार्याचा उल्लेख करून किल्ला सदृश्य देखावा उभा केला आहे. या युवारंग महोत्सवात मुलांपेक्षा ८०५ इतक्या मोठ्या संख्येत मुलींनी सहभाग घेवून जणू या पाचही रणरागिणींना अभिवादन केल्याने विद्यापीठाचा परिसर महिला सबलीकरणाने भारावलेला दिसून येत होता. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपला सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

रंगमंच क्र.१ चे उद्घाटन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शिवाजी पाटील, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, अधिसभा सदस्य अमोल मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. रंगमंच क्र.२ चे उद्घाटन अधिसभा सदस्य स्वप्नाली महाजन, कुलसचिव डॉ.विनोद पाटील यांनी केले. रंगमंच क्र. चे उघ्दाटन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. पवित्रा पाटील, डॉ.शिवाजी पाटील, डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, अधिसभा सदस्य नितीन ठाकुर, ऋषीकेश चित्तम यांनी केले. रंगमंच क्र.४ चे उदघाटन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. शिवाजी पाटील, अधिसभा सदस्य भानुदास येवलेकर यांच्या हस्ते करण्यात आले. रंगमंच क्र.५ चे उदघाटन अधिसभा सदस्य दिनेश चव्हाण, सागर पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, नितीन झाल्टे, अधिसभा सदस्य धिरज वैष्णव, सुरेखा पाटील, मंदा गावित , प्राचार्य एस.एन.भारंबे, किर्ती कमळजा आदी उपस्थित होते.

उदघाटनानंतर रंगमंच क्र.१ वर सकाळी ८.३० वाजता नक्कल (मिमिक्री) ही स्पर्धा कलावंतानी आपल्या सादरीकरणातून गाजवली. या स्पर्धेत १४ संघ सहभागी झाले. कलावंत स्पर्धकांनी शमशाद बेगम, लता मंगेशकर आदी नामवंत गायिकांचे आवाज, विविध पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याचा ध्वनी, विमान उड्डाण तसेच अमरीश पुरी, परेश रावल, सुनील शेट्टी, अमिताभ बच्चन, शक्ती कपूर, धर्मेंद्र, नाना पाटेकर, शत्रुघ्न सिन्हा, निळू फुले या सारख्या नामवंत चित्रपट कलावंतांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.
याच रंगमंचावर दुपारी १ वाजता मूकनाट्य स्पर्धेत २६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात सैनिक, स्त्रीभृण हत्या, शिवाजी महाराज, जिजाऊ , देशभक्ती, मोबाईलचे व्यसन आदी विषयांवर मूकनाटय सादर करत टाळया मिळविल्या. या मूकनाटयासाठी विद्यार्थ्यांनी चेहरे रंगवून आपल्या मूक अभिनयाने विषयांची मांडणी उत्तम पध्दतीने करत प्रेक्षकांपर्यंत आपले विषय पोहचविले आणि टाळया मिळविल्या.

रंगमंच क्र.२ वर सकाळी ९.०० वाजता वक्तृत्व या कलाप्रकारासाठी महिला सक्षमीकरण भारतीय परंपरा हा विषय देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरणावर पुढील प्रमाणे विचार मांडून सर्व प्रेक्षकांची दाद मिळवली. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत असताना महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल होताना दिसून येत आहे. तर सावित्रीबाई फुले यांनी शाळा सुरू केल्या नसत्या तर आजची स्थिती वेगळी असती. अत्याचार, बालविवाह, हुंडाबळी सारखे प्रकार थांबवले तर सक्षमीकरणाकडे वाटचाल अधिक प्रमाणात होवू शकेल. स्त्रीया सशक्त आहेत. स्त्रियांचे वर्चस्व होतांना दिसते आहे. महिला आर्थिक दृष्टया सक्षम होत आहेत. महिलांना पुर्णपणे स्वातंत्र मिळते आहे. महिलांना अधिक संधी देणे आवश्यक आहे. अन्याया विरूध्द कडक कायदे होणे गरजेचे आहे. या स्पर्धेत एकुण ७२ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

रंगमंच क्र. ३ वर सकाळी ९ वाजता भारतीय समुहगान या कलाप्रकारासाठी २० महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. हाथों मे मेहंदी मॉग में सिंधूर, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, गर्जा महाराष्ट्र माझा, पाडू चला रे भिंत, अंबाबाई लाड लाड ये गं, अपनी धरती अपना अंबर अपना हिंदूस्थान, देव मल्हारी मल्हारी माझा मल्हारी, ए वतन, वंदे मातरम, मौहा जारे, गीत खुशीके गुणगुणाते, महाराष्ट्राची पवित्र भुमी भारत भु चा प्राण, अनादी निर्गुण प्रगराणी, गुरूशरण में संभलके चलना, मेरा वतन मेरा चमन, आता उठवू सारे रान, आता तरी रंग सुना, जहॉ डाली पर सोने की चिडीया, नदीच्या पल्याड आईचा डोंगर, बलसागर भारत होवो यासह अनेक समुहगान सादर करीत विद्यार्थ्यांनी दाद मिळवली. आपली कला सादर करताना विद्यार्थ्यांनी गाण्याशी संबंधित पेहराव केले होते.
रंगमंच क्र.४ येथे भारतीय शास्त्रीय वाद्यसंगीत (स्वरवाद्य) सकाळी ८.३० वाजता या स्पर्धेला सुरूवात झाली. या स्पर्धेत १० महाविद्यालये सहभागी झाले होते. यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता. विद्यार्थ्यांनी बासरी व हार्मोनियम या स्वरवाद्यांवर आपली कला सादर केली. त्यावेळी काही कलावंतांनी तबला, ढोलक आदी वाद्यांची साथ संगत घेतली. विद्यार्थ्यांनी दुर्गा, नटभैरव, देस, हंसध्वनी, भुप, यमन यासारख्या रागांवर आपल्या कलेचे प्रभुत्व दाखवत स्पर्धेत रंगत निर्माण केली. आणि प्रेक्षकांच्या टाळया मिळवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. दुपारच्या सत्रात भारतीय वाद्यसंगीत (तालवाद्य) या कलाप्रकारात १४ कलावंतांनी सहभाग घेतला. त्यांनी तबला, पखावत व ढोलकी या वाद्यांवर आपले प्रभुत्व दाखवित कला सादर केली व प्रेक्षकांची दाद मिळवली.

रंगमंच क्र.५ वर सकाळी ८.३० वाजता स्थळ चित्र स्पर्धेत ५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्थळ चित्रासाठी विद्यापीठ परिसर हा विषय चित्रकार विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी संपूर्ण विद्यापीठ परिसरातील विविध ठिकाणी जाऊन आपआपल्या आवडीच्या विषयासंदर्भातील जागा शोधून त्या ठीकाणी चित्र रंगवितांना दिसत होते. त्यामुळे ही स्पर्धा पूर्ण विद्यापीठ परीसरात दिसून आली. दुपार सत्रात व्यंगचित्र या स्पर्धेत ३१ व्यंगचित्र कार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच १ दिव्यांग विद्यार्थ्याने सहभाग नोंदविला. या स्पर्धेकरीता मतदान जनजागृती व आजची शिक्षण पध्दती हे विषय देण्यात आले होते.

महोत्सवातील उद्याचे कार्यक्रम-
उद्या शनिवार दि.२६ ऑक्टोबर रोजी रंगमंच क्रमांक १ (पदवीप्रदान सभागृह -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह) येथे सकाळी ८.३० वाजता प्रहसन, दुपारी ४ वाजता भारतीय लोकसंगीत वाद्यवृंद.
रंगमंच क्रमांक २ (सिनेट सभागृह -राजमाता जिजाऊ सभागृह) येथे सकाळी ८.३० वाजता वादविवाद
रंगमंच क्रमांक ३ (सामाजिक शास्त्रे प्रशाळा – ताराराणी सभागृह) सकाळी ८.३० वाजता पाश्चिमात्य समुह गान
रंगमंच क्रमांक ४ (रासायनिक तंत्रज्ञान संस्था – राणी लक्ष्मीबाई सभागृह) सकाळी ८.३० वाजता पाश्चिमात्य गायन- एकल, दुपारी १ वाजता पाश्चिमात्य वाद्यसंगीत – एकल, सायंकाळी ४ वाजता भारतीय नाटयसंगीत-एकल
रंगमंच क्रमांक ५ (जैवशास्त्र प्रशाळा – राणी दुर्गावती सभागृह) सकाळी ८.३० वाजता मातीकला, दुपारी १ वाजता स्थळचित्रण प्राथमिक फेरी, सायंकाळी ४ वाजता पोस्टर मेकिंग या स्पर्धा होणार आहेत.















Discussion about this post