मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला असून आज महायुतीची महत्वाची पत्रकार परिषद पार पडत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा राज्यासमोर मांडलं आहे.
अजित पवार यांनी ‘रिपोर्टकार्ड’ मांडलं. मेजर गोष्टी रिपोर्टकार्डमध्ये आहे. क्रीडा, सांस्कृतिक विकास, ग्रामिण विकास आणि रोजगार या सर्व गोष्टी आम्ही समाविष्ट केल्या आहेत. दोन अडीच वर्षाच्या कामगिरीचा अहवाल आम्ही देत आहोत. महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात आणलेल्या बदलाचा हा अहवाल. शेतकरी, महिला, कष्टकरी या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी मेहनत घेतली. त्याचा लेखाजोखा आम्ही मांडत आहोत. आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचं काम करत आहोत. आम्ही जनतेचं जीवन बदलण्याचा प्रयत्न केला, असं अजित पवार म्हणालेत.
देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा!
“आमच्यासाठी विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे तर विरोधकांसाठी ऐलान झाले आहे. स्थगिती सरकार गेल्यानंतर राज्यात गती आणि प्रगतीचे सरकार आले. महायुती सरकारने सर्व क्षेत्रात विकासकामे केली. अनेक परिवर्तन करणाऱ्या योजना आम्ही आणल्या. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचे काम महायुती सरकारने केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकाही प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नव्हती,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला, ते आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेचे धडे देत आहेत. जगातील सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही महिलांना मदत करु त्यांना सुरक्षितही ठेऊ. विरोधकांकडून फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही घटना झाल्या की तात्काळ कारवाई होते. महायुती सरकारने प्रचंड काम केले आहे,” असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
रिपोर्ट कार्ड काढायला हिंमत लागते: CM शिंदे
एका रिपोर्ट कार्डमध्ये बसणार नाही, एवढे काम महायुती सरकारने केले आहे. रिपोर्ट कार्ड काढण्यासाठी हिंमत लागते, काम करावे लागते. आम्ही एवढी कामे केली की ती रिपोर्ट कार्डमध्येही मावत नाहीत. पायाभूत सुविधांमध्ये आज महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. अटल सेतू, समृद्धी महामार्ग, कोस्टर रोड सारखे प्रकल्प महायुती सरकारने पूर्ण केले. महायुती सरकारचे काम वाखाणण्यासारखे आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडला.















Discussion about this post