जालना । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, निवडणूक जाहीर होताच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत महायुतीला इशारा दिला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
जालन्यात पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘मराठ्यांना बेदखल करण्याचं काम देवेंद्र फडणीस यांनी केलं. मराठ्यांना आशा होती की, सरकार आपल्या लेकरांना आरक्षण देईल. पण सरकारनं आशा संपवली. आंदोलन आणि मराठा समाज एकत्र ठेवायचा नाही. मराठ्यांची पोर आरक्षणापासून वंचित राहिले पाहिजे, भिकारी झाले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांच्या विरोधात काम केलं. मराठ्यांना डिवचण्यासाठी ओबीसीत जाती घातल्या’.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीला मोठा इशारा दिला आहे. “तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही”, असा थेट इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी वारंवार उपोषण आणि आंदोलने केली. पण त्यांच्या सर्व मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे जरांगे यांनी याआधीच विधानसभेत महायुतीला धडा शिकवू असा इशारा दिला होता. यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. त्यामुळे आम्ही मनोज जरांगे पाटील यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला.















Discussion about this post