पाचोरा । जोरदार येणाऱ्या परतीच्या पावसाने नदी, नाल्यांना पूर आला आहे. यात पाचोरा तालुक्यातील अग्नवती नदीला देखील मोठा पूर आल्याने पुराचे पाणी बाजारपेठेत शिरले होते. यामुळे बाजारपेठेतील साहित्य गोळा करत असताना पाण्याचा अचानक लोंढा आल्याने यात दोन जण वाहून गेल्याची घटना नगरदेवळा येथे घडली.
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील सीमा सुरक्षा दलातील निवृत्त जवान रवींद्र प्रभाकर पाटील (वय ४०) आणि राजेंद्र गोरख पाटील (वय ३८) अशी मृतांची नावे आहेत. जळगाव जिल्ह्यात परतीचा पाऊस जोरदार होत आहे. यात रविवारी रात्रीसुध्दा पाचोरा आणि भडगाव तालुक्याला पुन्हा एकदा झोडपून काढले. त्यामुळे नगरदेवळा परिसरातील तितूर, अग्नावती, गडद, अरुणावती या नद्यांना पूर आला. यामुळे प्रचंड नुकसान होत आहे.
दरम्यान अग्नावती नदीला आलेल्या पुराचे पाणी सोमवारी पहाटे नगरदेवळा येथील बाजारपेठेत शिरले. अग्नावती नदीला पूर आला असताना बाजारातील साहित्य आवरताना पुराचा लोंढा आल्याने रवींद्र पाटील व राजेंद्र पाटील हे दोघे वाहून गेले. दुपारी बाजारपेठेतील दुकानदार आपल्या दुकानाकडे आले असता, त्यांना नदीकाठावरील झुडूपांमध्ये या दोन जणांचे मृतदेह आढळून आले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दोघांचे मृतदेह देण्यात आले यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला.















Discussion about this post