दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कथित दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मनीष सिसोदिया 17 महिन्यांपासून तिहार तुरुंगात होते.
कथित दारू घोटाळ्यातील खटला सुरू होण्यास होत असलेला विलंब पाहता सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडी या दोन्ही प्रकरणांमध्ये जामीन मंजूर केला आहे. मनीष सिसोदिया सध्या तिहार तुरुंग क्रमांक-1 मध्ये बंद आहेत. तिहारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा जामीन आदेश तुरुंगात येतो, जामीनदार येतात आणि जामीन बॉण्ड भरला जातो, तेव्हा त्यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू होईल.
न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवरील निर्णय ६ ऑगस्ट रोजी राखून ठेवला होता. त्यावर आज शुक्रवारी निकाल देताना न्यायमूर्ती गवई म्हणाले की, 17 महिन्यांचा तुरुंगवास आणि खटला सुरू न झाल्याने त्यांना खटल्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. 400 हून अधिक साक्षीदार पाहता, खटला लवकर पूर्ण होण्याची शक्यता नाही असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे.
मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाने १० लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. याशिवाय दोन मोठ्या अटीही घालण्यात आल्या आहेत. पहिली अट म्हणजे त्यांना त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागेल. आणि दुसरी अट म्हणजे त्यांना दर सोमवार आणि गुरुवारी पोलिस ठाण्यात हजर राहावे लागेल.















Discussion about this post