मुंबई । लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठं अपयश सहन करावं लागल्याने भाजपला धक्क्यावर धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्याभरात भाजपच्या दोन मातब्बर नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता भाजपचा आणखी एक माजी आमदार पक्षाला सोडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील भाजपच्या माजी आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या माजी आमदाराने शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून प्रवेशाची तारीखही ठरली आहे.
भाजपाचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. भालेराव हे येत्या 11 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. सुधाकर भालेराव हे उदगीरमधील मोठं प्रस्थ आहे. लातूर जिल्ह्यात त्यांचा मोठा दबदबा आहे. त्यांनी पक्ष सोडल्याने त्याचं भाजपला मोठं नुकसान होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, यापूर्वी भाजपच्या दोन मातब्बर नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे आणि लातूरचे भाजपचे माजी आमदार विनायकराव पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.















Discussion about this post