मुंबई । विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. यात शिवसेना ठाकरे गटाने ऐन मोक्याच्या क्षणी मोठा डाव टाकला असून मिलिंद नार्वेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली. तर दुसरीकडे भाजपकडून पंकजा मुंडे, शिंदेंच्या शिवसेनेकडून भावना गवळी यांनी अर्ज दाखल केला आहे. यामुळे ही निवडणूक चुरशीची लढत होणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथी गृहावर (ता. २ जुलै) रात्री आपल्या पक्षातील आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी आमदारांना काही महत्वाच्या सूचना केल्या. निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत महायुतीच्या सर्व ९ जागा निवडून आणायच्या आहेत. त्यासाठी तयारीला लागा, आपआपल्यात मतभेद होऊ देऊ नका, असं सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदारांचे चांगलेच कान टोचले.
त्याचसोबत विधानसभा निवडणुकीसाठीही आतापासूनच तयारी करा. आपआपल्या मतदारसंघातील लोकांसोबत संपर्क साधा. त्यांच्यापर्यंत सरकारने आणलेल्या योजना पोहचवा. लाडकी बहीण यासारख्या शासन योजनांची त्यांना माहिती द्या, अशा सूचनाही शिंदे यांनी आपल्या पक्षातील आमदारांना केल्या आहेत.
विधानपरिषदेची निवडणूक चुरशीची होणार
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी बिनविरोध निवडणूक व्हायला हवी, असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता. यासाठी त्यांनी विरोधी पक्षातील काही नेत्यांसोबत संपर्कही साधला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी ऐन मोक्याच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर करत महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडणुकीच्या रिगणात उतवरला. त्यामुळे आता निवडणूक अटळ आहे.
विधान परिषद निवडणुकीतील ११ जागांसाठी महायुतीचे ९ आणि महाविकास आघाडीचे ३ उमेदवार असे एकूण १२ उमेदवार रिंगणात आहे. विधानसभेतील आमदारांचे सध्याचे संख्याबळ पाहता महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विधानपरिषद निवडणुकीत निवडून येऊ शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीचे फक्त २ उमेदवारच निवडून येऊ शकतात.
मात्र मागील काही दिवसांपासून शिंदे गटातील काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते करीत आहेत. असाच दावा अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांबाबत शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांचा देखील आहे. विधानपरिषद निवडणुकीत तिसरा उमेदवार निवडून येण्यासाठी महाविकास आघाडीला ५ ते ६ आमदारांची गरज आहे. त्यामुळे महायुतीचे आमदार फुटणार का? असा प्रश्न अनेकांना पडलाय.















Discussion about this post