उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली असून यात यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. मृतांमध्ये 25 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. यात अनेक जण जखमी झाले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताची दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत. ADG आग्रा आणि अलिगडच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तपास पथक तयार करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रतीभानपूरमध्ये भोले बाबा यांचे सत्संग कार्यक्रम आयोजित केला होता. या सत्संगात हजारो लोक जमले होते, असे सांगण्यात येत आहे.
अचानक काही अज्ञात कारणामुळे चेंगराचेंगरी होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या चेंगराचेंगरीत अनेक लोक जमिनीवर पडले आणि गंभीर जखमी झाले. या अपघातात जखमींना मेडिकल कॉलेज एटा येथे पाठवण्यात आले असून, तेथे 27 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
घटनेनंतर जखमींना तात्काळ एटा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयात वैद्यकीय सुविधा वाढवण्यासाठी आणि जखमींवर उपचार करण्यासाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. या चेंगराचेंगरीमागची कारणे तपासली जात आहेत. प्राथमिक माहितीनुसार, गर्दीत अचानक अफवा पसरल्याने चेंगराचेंगरी झाली. गर्दी खूप मोठी होती आणि सुरक्षा व्यवस्था पुरेशी नव्हती असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.















Discussion about this post