जळगाव । यंदा मान्सून महाराष्ट्रात वेळेआधी दाखल झाला होता. पहिल्या दोन तीन पावसाच्या जोरदार सरी बरसल्यानंतर मागील १० दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली होती. पेरण्या खोळंबल्याने शेतकरी पावसाची आतुरनेने वाट पाहत होते. अशातच आता आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबारसह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल, असा इशारा आयएमडीने दिला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा एकदा मौसमी पाऊस सक्रिय झाला आहे. येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूरसह अन्य जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबारसह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून मुंबईत मोसमी पावसाने विश्रांती घेतली होती.परिणामी, तापमानात वाढ झाल्याने मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. बुधवारपासून मुंबई आणि उपनगरांत पावसाने हजेरी लावली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.















Discussion about this post