जळगाव । जळगाव जिल्हा वासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जळगाव विमानतळावरून गोवा, हैदराबाद, पुणे या विमानसेवेनंतर आता जळगाव-मुंबई विमानसेवा गुरुवारपासून प्रारंभ होत आहे.
आज गुरुवारी, २० जूनपासून जळगाव-मुंबई विमानसेवेस प्रारंभ होणार आहे. ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू असणार आहे. या विमानसेवेच्या तिकिटाचा दर २,१०० रुपये ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सुद्धा या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. व्यापारी आणि उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
अलायन्स एअर या विमान कंपनीकडून ही सेवा पुरविली जाणार असून जळगाव मुंबई विमानसेवेच्या फेऱ्यांचे दिवस वाढवले असून भाडे सुद्धा कमी केले आहे. सुरुवातीला आठवड्यातून दोन दिवस सेवा व तिकीट दर ३,४४० रुपये असे जाहीर केले होते, मात्र आता मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार अशी तीन दिवस सेवा व तिकिटाचे दर २,१०० रुपये केले आहेत.
उडान 5.0 योजनेअंतर्गत जळगाव-मुंबई या विमान सेवेला मंजुरी मिळाली आहे. तिकीट बुकिंग देखील अलायन्स एअर कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर सुरू केले आहे. परंतु, सुरुवातीला तिकिटाचे दर जास्त आणि सायंकाळच्या वेळेची सुविधा नसल्याने प्रतिसाद नसल्याची माहिती, तिकीट बुकिंग एजंट यांच्याकडून देण्यात आली. त्यामुळे आता या वेळेत व तिकीट दरात देखील कपात करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव-मुंबई जाणाऱ्या प्रवांशांसाठी ही महत्त्वाची बाब आहे.















Discussion about this post