जळगाव । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीची राज्यात पीछेहाट झाली. राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याच्या वल्गना करणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागांवर विजय मिळवता आला. यामुळे पराभवाचे महायुतीत चिंतन, मंथन सुरु झाले आहे. भाजपचे काही आमदार अजित पवार गटावर नाराज आहेत तर भाजपच्या वरिष्ठांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे कान पिळले आहेत. यातच जळगावमध्ये भाजपच्या कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
जळगावातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी बंदद्वार घेतलेल्या बैठकीत खडे बोल सुनावले. जळगाव लोकसभेतील उमेदवारांना पाहिजे तसं मताधिक्य न मिळाल्याने मंत्री गिरीश महाजन यांची पदाधिकारी कार्यकर्त्यांवर नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
जळगाव लोकसभेच्या स्मिता वाघ यांना एकूण 3 ते साडे तीन लाख एवढे मताधिक्य मिळेल अशी मंत्री गिरीश महाजन यांची अपेक्षा होती.जळगाव शहरातूनही त्या त्या बुथवर पाहिजे त्या प्रमाणात मताधिक्य मिळाले नाही. काही भागात हक्काचा मतदार होता, तिथे पण मतांचा टक्का न वाढल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी नगरसेवकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.
पुन्हा चूक झाल्यास पक्षातून हकालपट्टी
मताधिक्यामध्ये आणखी वाढ झाली असती मात्र अनेकांनी मनापासून काम न केल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची कान उघडणी केली. जळगाव शहरातील जी एम. फाउंडेशन या संपर्क कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांनी तब्बल एक तास बंद दारा आड बैठक घेतली. यामध्ये त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याची माहिती समोर आली आहे. आगामी निवडणुकांमध्ये अशा पद्धतीने चूक पुन्हा केल्यास पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा मंत्री गिरीश महाजन यांनी या बंद द्वार बैठकीत पदाधिकाऱ्यांना इशारा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.















Discussion about this post