मुंबई । एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना महागाई काही कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीय. सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातील बजेट आता आणखी कोलमडणार आहे. कारण तुरडाळीच्या दरामध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांत बाजारात डाळींची आवक घटली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात तुरडाळीची किंमत वाढली आहे. आता तूरडाळ १०० रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे. यावर्षी डाळींच्या उत्पादनात सरासरी ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरीही वाढत्या मागणीमुळे तुरडाळीच्या दरात देखील वाढ झाली आहे.सध्या एपीएमसी मार्केटमध्ये डाळीची आवक घटलेली आहे.तुरडाळ प्रामुख्याने विदर्भातील अकोला, यवतमाळ, मराठवाडा आणि लातूरमधून येत असते
अवकाळी पाऊस आणि वाढत्या उष्णतेचा परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाल्याचं व्यापारी सांगत आहे. येत्या महिन्यात डाळींची आवक वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. परंतु डाळीचे दर कमी होण्याची शक्यता नसल्याचं व्यापारी सांगत आहेत. वाढत्या किमतीचा परिणाम तुर डाळ खरेदीवर झाला आहे. बाजारात डाळींची खरेदी कमी झालीय, तर व्यापारीदेखील कमी डाळ खरेदी करत असल्याची माहिती मिळत आहे.
तुरीच्या डाळीची किंमत मालाच्या गुणवत्तेनुसार साधारण ७० ते १४० रुपये प्रति किलो असते. परंतु, एपीएमसी बाजारात तूरडाळीची किंमत आता दीडशे रुपयांच्या पुढे गेली आहे. २६ एप्रिल रोजी एपीएमसीच्या बाजारात तुरीडाळीचे दर ११० ते १७० रुपये किलो होते. हरभरा डाळीची किंमत ६८ ते ८५ रुपये प्रति किलो आहे. मसूर डाळ ७१ ते ११५ रुपये प्रति किलोने विकली जातेय. मूग डाळीची किंमत देखील ९९ ते १४० रुपये किलो झाली आहे. उडीद डाळीचा दर ८३ ते ११५ रुपये प्रति किलो आहे. चवळी ८० ते १३५ रुपये प्रति किलोने विकली जातेय.















Discussion about this post