पुणे । वेस्टर्न डिस्टबर्न्सच्या प्रभावामुळे देशासह महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे काढणीवर आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच येत्या ४८ तासांत पुन्हा पावसाची हजेरी दिसून येणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत महाराष्ट्रासह, मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तराखंड आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होऊ शकते, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिके व्यवस्थित झाकून ठेवावी, असा सल्लाही देण्यात आला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांना गारपीटीने तडाखा दिल्याने रब्बी पिकांसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. सरकारने लवकरात लवकर नुकसानीची पाहणी करून मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
महाराष्ट्रात येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस
मुंबई तसेच पुण्यासह, मराठवाडा, विदर्भ तसेच खान्देशात पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.















Discussion about this post