छत्रपती संभाजीनगर । मोबाइलवर इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातून वर्षभरात तब्बल २१ कोटी ५९ लाख ३८ हजार २८७ रुपये दोन कंत्राटी लिपिकांनी काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात हर्षकुमार अनिल क्षीरसागर (रा. बीड बायपास), यशोदा शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात यशोदा शेट्टी व तिचा पती बी.के. जीवन याला अटक करण्यात आली. पतीचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय आहे. क्षीरसागर मात्र पसार झाला. आर्थिक गुन्हे शाखा सखोल तपास करत आहे.
हा प्रकार जून ते डिसेंबर २०२४ या काळात विभागीय क्रीडासंकुलात घडला. आरोपींनी क्रीडा उपसंचालकाच्या नावे बनावट सहीच्या पत्राचा बँकेत वापर केला. हा प्रकार क्रीडा उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या लक्षात लवकर कसा आला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. क्रीडा अधिकारी तेजस दीपक कुलकर्णी यांनी याबाबत तक्रार दिली.
तक्रारीनुसार, ७ सप्टेंबर २०२३ पासून विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा या पदाचा अतिरिक्त कारभार संजय सबनीस यांच्याकडे आहे. विभागीय क्रीडासंकुलाच्या नावे इंडियन बँक (अलाहाबाद बँक) मुख्य शाखा जालना रोड येथे बैंक खाते आहे. बँकेचा व्यवहार चेक/आरटीजीएसद्वारे होतो. स्वाक्षरीचे अधिकार समितीचे सचिव तथा क्रीडा उपसंचालक यांना आहेत. विभागीय क्रीडा संकुलात मे. दिशा फॅसिलिटीज प्रा. ली. यांच्यामार्फत फेब्रुवारी २०२२ पासून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेण्यात आले. संगणक ऑपरेटर म्हणून आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला नेमले.
त्यानंतर २०२३ मध्ये मे. वेब मल्टी सर्व्हिसेस यांनी हर्षकुमारलाच लिपिक / संगणक ऑपरेटर या पदावर आणि यशोदा शेट्टी हिला लेखा लिपिक म्हणून कार्यालयात नेमले. इतर १९ कर्मचारीही आहेत. हर्षकुमार आणि यशोदा हे दोघे पत्रव्यवहार, कॅशबुकमध्ये नोंदी घेणे, पावती बुक लिहिणे, बँकेशी पत्रव्यवहार करणे, बँक खात्याचे स्टेटमेंट मागविणे, रेकॉर्ड ठेवणे आदी कामे करतात. संकुलाच्या बँक खात्यात शासन अनुदानातून ३१ मार्च २०२४ अखेर २२ कोटी ८९ लाख १० हजार ४७३ रुपये शिल्लक होते. या निधीतून संथेटिक ऍथलेटिक्स ट्रक व ऍस्ट्रोस्टफ हॉकी फिल्ड सुविधा विकसित करण्यासाठी २०२३ मध्ये टेंडर काढण्यात आले. मात्र प्रकरण खंडपीठात गेल्याने प्रक्रिया थांबली.
सप्टेंबर २०२४ रोजी प्रकरण संपले. पण विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यानंतर १२ डिसेंबरला निविदा प्रक्रियेसाठी उपसंचालकांनी बँक खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी मॅनेजरला स्टेटमेंट मागितले. त्याने क्षीरसागरने दिलेल्या मेलवर पाठिवले. वरिष्ठ लिपिक स्वप्नील तांगडे यांनी पुन्हा फोन करून स्टेटमेंट आले नसल्याचे सांगितले. त्यावेळी बँक मॅनेजरने क्षीरसागरने दिलेला मेल सांगितला. तो आमचा नाही, असे म्हणून अधिकृत मेलवेर बँक स्टेटमेंट मागविले. तेव्हा त्यात केवळ १ कोटी ३६ लाख ९७ हजार १४५ एवढीच रक्कम शिल्लक असल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला.















Discussion about this post