भुसावळ: एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने लांबवणाऱ्या टोळीला भुसावळ पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. भुसावळ बसस्थानकावर एका वृद्ध महिलेची सोन्याची पोत चोरणाऱ्या सराईत महिला आरोपीला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख २० हजार रुपये किमतीची २२ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हस्तगत केली आहे.
मुक्ताईनगर येथील रहिवासी कुसुम देविदास चौधरी (६२) या २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी भुसावळ बसस्थानकावरून चोपडा बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये चढताना असलेल्या तुफान गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील सोन्याची पोत अत्यंत शिताफीने लंपास केली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी तपासासाठी विशेष पथक नियुक्त केले होते. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कुलसुमबी मुस्ताक शेख (रा. यावल) हिच्यावर पाळत ठेवून तिला ताब्यात घेतले. कडक चौकशीत तिने चोरीची कबुली दिली असून, तिच्याकडून संपूर्ण ३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भुसावळ बसस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या यशस्वी कारवाईनंतर पोलिसांनी प्रवाशांना दिलासा दिला असला तरी, बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.















Discussion about this post