मुंबई । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सध्या राज्यात मागील काही दिवसापासून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्या जागा वाटपावरून तू-तू मै मै सुरु असल्याचा पाहायला मिळेल. मात्र अशातच शिवसेनेकडून वृत्तपत्रात छापून आलेल्या एका जाहिरातीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
कारण राज्यात उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? यासंदर्भात एक सर्वे झाला असून त्या सर्वेची जाहिरात शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्याच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ अशी जाहिरात आपल्याला सतत पाहायला मिळली आहे. मात्र अशातच आता ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
सर्वेची जाहिरातीनुसार फडणवीसांपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. या जाहिरातीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं असून त्यामुळे आता यावर भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे, असा दावा करणारी जाहिरात करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के कौल राज्यातील जनतेने दिला असल्याचा दावा केला आहे. राज्यातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे, असे जाहिरातीत म्हटले आहेच.
मुख्यमंत्री पदासाठी कोण
मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के जनतेने पसंती दिली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली आहे. म्हणजेच, राज्यातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली, असल्याचा दावा जाहिरातीत केला आहे.
Discussion about this post