मध्य पूर्वेतील परस्परांच्या लष्करी तळांवर होणारे हल्ले आता ऊर्जा युद्धामध्ये बदलले आहेत. इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर हल्ला केल्यानंतर वातावरण बिघडून गेलं आहे. या हल्ल्यानंतर इराणने कतार आणि सौदी अरेबियाच्या तेल आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले केले. या हल्ल्यामुळे कतरची 17 टक्के LNG निर्यातीची क्षमता बाधित झाली.QatarEnergy चे सीईओ साद अल काबी यांनी या हल्ल्याची पुष्टी करत मोठ्या नुकसानीची माहिती दिली आहे.
या हल्ल्यात एलएनजी उत्पादन क्षमतेला मोठा फटका बसला असून सुमारे १७ टक्के निर्यात क्षमतेवर परिणाम झाला आहे. वार्षिक सुमारे २० अब्ज डॉलर इतके नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काबी यांच्या माहितीनुसार, १४ एलएनजी ट्रेनपैकी दोन ट्रेन आणि गॅस-टू-लिक्विड्स (GTL) प्रकल्पातील एक युनिट गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाले आहे. या नुकसानीतून पूर्णपणे सावरण्यास किमान ३ ते ५ वर्षांचा कालावधी लागू शकतो. या घटनेचा थेट परिणाम युरोप आणि आशियातील गॅस पुरवठ्यावर होणार असून, युरोपमध्ये गॅसच्या किमतीत तब्बल ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
भारतावर काय परिणाम होणार?
दरम्यान, भारतासाठीही ही परिस्थिती चिंताजनक ठरू शकते. भारताच्या एकूण एलएनजी आयातीपैकी सुमारे ४० टक्के पुरवठा कतारकडून होतो. याबाबत परराष्ट्र मंत्रालय चे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांवरील हल्ले थांबवणे अत्यंत गरजेचे असून ही घटना जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी धोकादायक आहे.
मध्य पूर्वेतील तणाव वाढत असताना ऊर्जा बाजार अस्थिर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, आणि त्याचे परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांवर दिसून येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.















Discussion about this post