बीड : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज बीडच्या मकोका न्यायालयात सुनवाणी झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदाच कोर्टात बाजू मांडली. यावेळी उज्ज्वल निकम आणि आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद केला. या प्रकरणात पुढील सुनावणी आता १० एप्रिल रोजी होणार आहे.
दरम्यान यावेळी उज्ज्वल निकमांनी न्यायालयासमोर हत्याप्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पवनचक्की कंपनीला मागण्यात आलेली खंडणी आणि नंतर झालेली सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या दोन घटनांचा कसा संबंध आहे, हेदेखील निकम यांनी माहिती देताना सांगितलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मीक कराडसह सर्व आरोपींना व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
या घटनेची संपूर्ण माहिती व कागदपत्रे कोर्टाला देण्यात आल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यासाठी १० एप्रिलाला कोर्टात अर्ज केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मात्र, एक गोष्टी चार्जशीटमध्ये नव्हती. ती म्हणजे सीडीआर. हाच सीडीआरचा मुद्दा उज्ज्वल निकम यांनी आज न्यायालयात मांडला.
उज्ज्वल निकम म्हणाले की, २९ नोव्हेंबर रोजी खंडणीबाबत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. खंडणीसाठी विष्णू चाटेच्या कार्यालयात जी बैठक झाली त्या बैठकीला सर्व आरोपी हजर होते. वाल्मीक कराड याने जगमित्र या त्याच्या कार्यालयात पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागितली. त्यानंतर जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणीला विरोध केला तेव्हा सुदर्शन घुले याने पवनचक्की कंपनीच्या वॉचमनला मारहाण केली. या मारहाणीनंतर तिरंगा हॉटेल येथे झालेल्या बैठकीत संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा, असे विष्णू चाटे याने सुदर्शन घुलेला सांगितले. या संपूर्ण प्रकरणात वाल्मीक कराडने आरोपींना गाइड केले, असा दावा उज्वल निकम यांनी कोर्टात केला आहे.
उज्ज्वल निकम यांनी यावेळी हा खटला आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचे सांगितले. मात्र, वाल्मिक कराड याच्या वकिलांनी त्याला विरोध केला. 12 मार्च रोजी केज न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलाने चार्जशीटमधील गोपनीय जबाब आणि कागदपत्रं मागितली होती. आज सुनावणी दरम्यान आरोपींच्या वकिलांककडून पुन्हा गोपनीय डॉक्युमेंट आणि चार्जशीट मधील जबाबाची मागणी करण्यात आली. सरकारी वकील उज्वल निकम यांनी त्यांच्या जवळील केस संदर्भातील डॉक्युमेंट केले न्यायालयापुढे सादर केले. सुनावणीसाठी आरोपीचे वकील विकास खाडे, राहुल मुंडे, आनंत तिडके न्यायालयात हजर होते.
Discussion about this post